The Sacred Books
This page is dedicated to the divine literary works of Param Pujya Paramatmaraj Maharaj. Each book is a beacon of spiritual wisdom, designed to eradicate conflict, foster interfaith harmony, and guide the seeker on the path to self-realization. Discover the unique essence and publication details of each granth below.
परमाब्धि
परमाब्धि ग्रंथाविषयी परमपूज्य परमात्मराज महाराजांनी एकदा प्रकट केलेले काही विचार –
सध्या जातिधर्मसंप्रदायांच्या मुद्यांवरून प्रचण्ड तणावपूर्ण वातावरण आहे. शांती भंग पावली आहे. प्रचण्ड हिंसाचार फोफावला आहे. परन्तु या परिस्थितीमध्ये बदल होणे तर गरजेचे आहे. त्याकरिता विविध जातिधर्मसंप्रदायांच्या लोकांमध्ये परस्पर सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. ‘परमाब्धिः’ हा ग्रंथ पूर्वकाळात होऊन गेलेल्या विविध धर्मांमध्ये, संप्रदायांमध्ये समन्वय प्रस्थापित करून सर्व मानवांना ऐक्यस्थानी आवाहन करीत आहे. या ग्रंथाविषयी हिंदूधर्मान्तर्गत विविध संप्रदायांमधील अनेक साधुसंतांनी व इतर विद्वानांनी आपले पूर्णसमर्थनपर अभिप्राय आतापर्यन्त व्यक्त केलेले आहेतच, त्यासोबत ख्रिश्चनमुस्लिमादिवर्गांमधील अनेक मान्यवरांनी देखील आपले पूर्ण समर्थनपर अभिप्राय व्यक्त केले आहेत. (विविध वर्षांच्या भाविक भावना अंकांमध्ये साडेतीन हजारांहून जास्त मान्यवरांचे अभिप्राय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.)
परस्परांविषयी संघर्षमय पार्श्वभूमी असलेल्या हिंदूमुस्लिमख्रिश्चनादिवर्गांमधील मान्यवर व्यक्तींचे ‘परमाब्धिः’ ग्रंथासंबंधाने कसे काय एकमत झाले आहे, असा प्रश्न काहींना पडू शकतो. परन्तु याचे सुस्पष्ट व निःसंदिग्ध उत्तर परमाब्धि वाचनानंतर सहजपणे मिळत असते.
कोणी हिंदूत्त्ववादी असोत, बायबलवादी असोत, इस्लामवादी असोत, धर्मनिरपेक्षतावादी असोत किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मतांशी संबंधित असोत, त्यातील प्रत्येकाला सखोल वाचन केल्यावर मान्य होईल, आवडेल असा हा परमाब्धि ग्रंथ आहे.
पृथ्वीने आजवर धर्माधर्मांमधील जातिजातींमधील, पंथापंथांमधील संघर्षामुळे अत्यन्त भीषण अनुभव घेतले आहेत. स्वतःच्या लेकरांच्या रक्ताचे पूर तिच्यावरून वाहले आहेत. ‘आता हे सगळे थांबावे व विविध जातिधर्म-पंथांमध्ये विखुरलेली आपली सगळीच लेकरे सुखाने राहावीत व आपल्याला दिव्यशांतियुग अनुभवायला मिळावे, अशी रास्त इच्छा पृथ्वीने बाळगण्यात कोणाची हरकत असण्याचे कारणच असू शकत नाही.
म्हणूनच परमाब्धिमध्ये असलेल्या सर्वजनकल्याणमूलक विचारांचा प्रसार जनतेमध्ये सातत्याने होण्याची आता नितांत आवश्यकता आहे. परमाब्धिप्रसार हा सर्वजनहितकारक विचारांचा प्रसार आहे. या प्रसारकार्यात विविध धार्मिक वर्गांमधील साधुसंत, विविध राजकीय पक्षांमधील नेते, साहित्यिक तसेच इतरही क्षेत्रांमधील मान्यवरांच्या सहभागाची मोठी आवश्यकता आहे. अधिकाधिक मात्रेत माननीय व्यक्तींची अनुकूलता या प्रसार कार्यासाठी लाभत राहणे महत्त्वाचे आहे.
(चेयान या पुस्तिकेत परमाब्धि ग्रंथाच्या सार्वत्रिक व सार्वकालिक महत्वासंबंधाने जे विस्तृत वर्णन आहे तेही सर्व भाविकांनी अवश्य वाचावे.) (परमाब्धि ग्रंथाचे प्रकाशन विजयादशमी ला झाले होते याविषयी भाविकांना कल्पना आहेच.)
सत्पोष
सत्पोष ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत –
‘सत्पोष’ या ग्रंथात आत्मा, अंतःकरण, इच्छा, आशा, भावना, धारणा इत्यादी अनेकानेक विषयांसंबंधी सिद्धान्तरूप विचार आहेत.
सत्पोष या ग्रंथामध्ये लिहिलेल्या अनेकानेक ऋषिमुनी, राजे इत्यादींच्या जीवनामधील घटना सर्वजनांसाठी प्रेरक ठरणार आहेत. अनेकानेक सत्पुरुषांच्या संबंधातील दृष्टान्त हे सामाजिक एकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोणातून केलेली वर्णने धर्मश्रद्धायुक्त भाविकांप्रमाणेच विज्ञानप्रिय व्यक्तींनाही आनंद देणारी ठरतील.
‘सत्पोष’ या ग्रंथाच्या वाचनाने नाना शंकाकुशंका दूर होतील. सर्वांना सहज समजेल अशी भाषा असल्यामुळे सर्वांनीच या ग्रंथाचा पुरेपूर उपयोग करून घेणे सर्वांसाठीच हितावह ठरेल. जगभरातील अनेकानेक प्राचीन संस्कृतींशी संबंधित उदाहरणे मानवांमध्ये एकत्वाची भावना निर्माण होण्यासाठी अत्यन्त उपयुक्त ठरतील. आध्यात्मिक क्षेत्रात वाटचालीसाठी आवश्यक असलेले अनेकानेक महत्त्वपूर्ण सिद्धान्त या ग्रंथात आलेले असल्यामुळे हा ग्रंथ सर्वसामान्यांपासून मोठमोठ्या विद्वानांपर्यन्त-म्हणजेच सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
[ सत्पोष ग्रंथ प्रकाशन तिथी – फाल्गुन शु. षष्ठी शक १९३९ ( दि.२१/२/२०१८) ]
महोन्नय
महोन्नय ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत –
‘महोन्नय’ ग्रंथात वैतञ्च्यनिर्मूलनापासून बंधनिर्मूलनापर्यन्तचे सगळे विचार आहेत. म्हणजेच त्यात विविध अनिष्ट बाबींच्या निर्मूलनाच्या संबंधाने सैद्धान्तिक विचार माण्डलेले आहेत.
महोन्नय या ग्रंथामध्ये लिहिलेल्या अनेकानेक घटना जनतेसाठी उद्बोधक ठरणार आहेत. नाना जातिजमातींमधून उदयास आलेल्या अनेक महात्म्यांच्या संबंधातील कथा ह्या जनमनांमध्ये ऐक्यभाववृद्धीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
‘महोन्नय’ या ग्रंथाच्या वाचनाने जनमननांमधील अनेक संशयांचे निराकरण होईल. सहज समजणाऱ्या भाषेतील हा ग्रंथ सामान्यांपासून गहन अभ्यासकांपर्यन्त सर्वांनी वाचावा असा आहे.
जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविणारे विचार व सदैव संस्मरणीय असे विविध दृष्टान्त या ग्रंथांमध्ये आहेत. सुखी व समाधानी जीवनासाठी, जीवनात अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी तसेच आध्यात्मिक साधनेतील रहस्ये सहजसोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा ग्रंथ भाविकांना अतिशय महत्त्वाचा वाटेल. यावरून सर्वांना हे कळून येईल की ‘महोत्रय’ हा ग्रंथ सर्वजनहिताच्या दृष्टीनेच रचला आहे. या ग्रंथाच्या नांवातील रहस्ये या ग्रंथात बघायला मिळतात.
सद्ग्रंथ प्रकाशन सोहळा हा एक महान् सुयोगरूप असतो. असा हा महान् सुयोग सर्व श्रद्धावंतांच्या जीवनात आनंदाचा, सौहार्दाचा, मांगल्याचा प्रकाश घेऊन येत असतो. त्यामुळे सद्ग्रंथ प्रकाशनोत्सव हा निश्चितपणे सर्वांसाठी प्रकाशोत्सव ठरत असतो, यात तीळमात्र शंका नाही.
[ महोन्नय ग्रंथ प्रकाशन तिथी – फाल्गुन शु. सप्तमी शक १९३९ ( दि.२२/२/२०१८) ]
वर्तेट
‘वर्तेट’ ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत –
वर्तेट’ हा अध्यात्मविषयावरील ग्रंथ आहे. आध्यात्मिक क्षेत्रात जे समजून घ्यावयाचे अनेकानेक विषय असतात त्या सगळ्या विषयांची उकल भाविकांना यातून होईल. या ग्रंथाला ‘वर्तेट’ हे नांव कां देण्यात आले आहे, हे सुद्धा हा ग्रंथ वाचायला सुरू केल्यावर समजून जाईल.
‘ब्रह्मदेव, विष्णू व शिव’ ही रूपत्रयी, दत्तगुरू तसेच इतरही दैवतरूपांपैकी कोणत्याही रूपाची आराधना करणाऱ्या प्रत्येक सद्भक्ताने हा ग्रंथ वाचायलाच पाहिजे, असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. हा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचल्यावर या ग्रंथाविषयीचे प्रेम सर्व सद्भक्तांच्या अन्तःकरणामध्ये वाढत राहणार आहे. देवींपैकी कोणत्याही देवीची आराधना करणाऱ्या सद्भक्तांनाही हा ग्रंथ निश्चितपणे आवडेल.
सर्व जातींमधील, सर्व सम्प्रदायांमधील, सर्व धर्मविशेषांमधील अध्यात्मप्रेमी भाविकांमध्ये हा ग्रंथ नेहमी वाचत राहण्याची तीव्रतम ओढ निर्माण होऊन ती ओढ सातत्याने टिकून राहील, असा अदम्य व सर्वजनहितकांक्षी विश्वास आहे.
आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोणातून आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना सुद्धा हा ग्रंथ अतिशय लाभदायक ठरेल.
या ‘वर्तेट’ ग्रंथाला पूर्णतः वाचल्यावर सर्व भाविकांना वरील विविध विधानांची अत्यन्त गोड अनुभूती येईल. भद्रपद (कल्याणरूप पद) प्रदान करणाऱ्या आध्यात्मिक सिद्धान्तांचे वर्णन असलेल्या या ‘वर्तेट’ ग्रंथाचे प्रकाशन भाद्रपद पौर्णिमेला झाले आहे, हाही एक अत्यन्त चांगला असणारा परममांगल्यप्रदायक योग आहे.
[ वर्तेट ग्रंथ प्रकाशन तिथी – भाद्रपद पौर्णिमा शक १९४१ ( दि.१३/९/२०१९)]
रस्याव
‘रस्याव’ ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत-
रस्याव हा अध्यात्ममार्गक्रमणासाठी अत्यंत साहाय्यकारी असा ग्रंथ आहे. अध्यात्ममार्गाच्या आरम्भापासून साध्यस्थळापर्यन्तचा आवश्यक असा सगळा भाग अन्तर्भूत असलेला हा रस्याव ग्रंथ सर्व परमार्थपथिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. व्यावहारिक क्षेत्राप्रमाणेच आध्यात्मिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या अनेकानेक समस्यांच्या निराकरणासाठी या ग्रंथाचा भाविकांनी नेहमी अभ्यास करीत राहणे अतिशय हिताचे ठरेल. पारमार्थिक क्षेत्राप्रमाणेच व्यावहारिक दृष्टिकोणातूनही हा ग्रंथ मनुष्य जातीसाठी आत्यन्तिक हितकारी ठरेल.
मनुष्याच्या विचार करण्यात व वागण्यात अशा काही बाबी असतात की त्या पुष्कळदा परिवारातील इतर सदस्यांच्या लक्षातही येत नाहीत. परंतु त्या काही बाबी त्या व्यक्तीची, परिवाराची तसेच इतरही संबंधितांची मोठी हानी करण्याला कारणीभूत ठरू शकत असतात. तशी हानी टाळण्याच्या दृष्टिकोणातून तशा हानिकारक बाबींचे निराकरण करण्यासाठीचे अतिशय महत्वपूर्ण मुद्दे या ग्रंथात भाविकांना अत्यन्त सोप्या भाषेत वाचायला मिळतील.
रस्याव ग्रंथाच्या अन्तरंगात सर्वजातिधर्मसंप्रदायांमधील भाविकांना मान्य होईल असे विशुद्ध अध्यात्म आहे. सर्व वर्गांमधील भाविकांनी नेहमी आस्वाद घेत राहावा असा विशुद्ध सुबोधरस या ग्रंथात आहे.
हा रस्याव ग्रंथ धार्मिक क्षेत्रान्तर्गत विविध सांप्रदायिक धारांमधील लोकांना अतिशय आनन्द प्रदान करीत राहीलच. याशिवाय मानसशास्त्रान्तर्गत तसेच साहित्य क्षेत्रान्तर्गत असलेल्या विविध सम्प्रदायांच्या अभ्यासकांना सुद्धा या ग्रंथाच्या वाचनाने अतीव आनंदाची अनुभूती येईल.
आध्यात्मिक क्षेत्रासंबंधाने ज्या काही मुद्द्यांविषयी जनमनांमध्ये संभ्रम असतात ते संभ्रम या ग्रंथाच्या वाचनाने दूर होतील. नामसाधर्म्यजन्य अनेकानेक गोंधळ मनातून दूर करण्यासाठी या ग्रंथाच्या वाचनाचा भाविकांना फार मोठा उपयोग होईल. एकच नांव असलेल्या काही तीर्थस्थळांविषयी जनमनांमध्ये कधी कधी संभ्रम आढळून येतात. तशा संभ्रमांचे निराकरणही या रस्याव ग्रंथात भाविकांना आढळेल. अशा प्रकारे अनेक प्रचलित विभ्रमांच्या निरसनामुळे जनतेला अनेकानेक मुद्द्यांविषयी सत्य काय आहे ते समजून येईल.
व्यतिभार म्हणजे काय, व्यतिगण्ड म्हणजे काय, विम्राद म्हणजे काय इत्यादी पुष्कळशा मुद्द्यांविषयी भाविकांना कळून येईल. व्यतिभार, व्यतिगण्ड इत्यादींचे प्रकार, त्यांच्या निराकरणाचे उपाय इत्यादी मुद्दे सुविस्तृतपणे या ग्रंथात भाविकांना वाचायला मिळतील.
अतिप्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत घडलेल्या विविध घटनांच्या माध्यमातून आध्यात्मिक विषयांसंबंधीचे स्पष्टीकरण या रस्याव ग्रंथात आढळून येईल.
परमार्थमार्गाकडे वळण्यापासून साध्य मिळण्यापर्यंतच्या प्रवासातील विविध अत्यावश्यक बाबींचे दर्शन घडविणारा हा रस्याव ग्रंथ असल्याने सर्व वर्गांमधील भाविकांमध्ये या ग्रंथाच्या वाचनाची गोडी वाढत राहील.
परमाब्धि, सत्पोष, महोन्नय, वर्तेट, सिध्रेण इत्यादी ग्रंथांचा ज्याप्रमाणे भाविकांनी अत्यंत आनंदाने स्वीकार केला तसाच स्वीकार या रस्याव ग्रंथाचाही होईल, असा पूर्ण विश्वास आहे.
[ रस्याव ग्रंथ प्रकाशन तिथी – आषाढ शुक्ल सप्तमी शक १९४३ (दि.१६/७/२०२१) ]
तन्वास
‘तन्वास’ ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत –
तन्वास या ग्रंथाचे प्रकाशन कार्तिक पौर्णिमा या पवित्र पर्वकाळी झाले आहे. कार्तिक पौर्णिमेला मंदिरांमध्ये अनेकानेक दीप प्रज्वलित करण्याची एक परम्परा चालत आली आहे. अशा या प्रकाशपर्वकाळी पुष्कळशा सुबोधदीपांनी युक्त असलेल्या तन्वास ग्रंथाचे प्रकाशन होणे हा सर्व भाविकांच्या दृष्टीने महन्मंगल असा सद्भाग्यवर्धक योग आहे. सुबोधदीपांमुळे सर्वांचे अन्तःकरण सत्प्रकाशयुक्त होणे नेहमीच महत्त्वाचे असते. तसे घडल्यास सुबोधप्रकाशपर्वाचा आयुष्यभर भरपूर आनन्द घेता येत असतो
तन्वास ग्रंथामध्ये पारमार्थिक क्षेत्रीय पुष्कळशा अतिशय रहस्यमय मुद्यांचे विस्तृत स्पष्टीकरण आहे. पूर्वी जे काही मुद्दे अत्यन्त संक्षेपात व अत्यन्त गूढरूपात माण्डण्यात आले होते त्या काही मुद्यांचे अतिशय खुलासेवार वर्णन या ग्रंथात वाचकांना वाचायला मिळेल. याशिवाय व्यावहारिक जीवनात ज्या काही समस्या निर्माण होत राहतात त्या निर्माणच होऊ नये किंवा झाल्याच तर त्यांचे निराकरणही व्हावे, या दृष्टिकोणातूनही तन्वास ग्रंथाचे वाचन सर्वांसाठी अत्यन्त हितावह ठरेल.
सर्वसामान्य जनांपासून विविध क्षेत्रांमधील प्रगाढ अभ्यासकांपर्यन्त सर्वांनाच आवडेल, असा हा तन्वास ग्रंथ आहे. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, वाणिज्य, भाषाशास्त्र, कृषिशास्त्र इत्यादी अनेकानेक शास्त्रांपैकी कुठल्याही शास्त्राचे किंवा त्या शास्त्राच्या कुठल्याही शाखेचे अभ्यासक असोत त्या सर्वांमध्ये पारमार्थिक मार्गाविषयीची आवड अधिकाधिक प्रमाणात वाढविण्याचे कार्य हा तन्वास ग्रंथ करीत राहील.
पुष्कळशा भाविकांनी आतापर्यन्त परमाब्धि, सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव इत्यादी ग्रंथांचा अत्यन्त प्रसन्न अन्तःकरणाद्वारे आस्वाद घेतलेला आहेच. परन्तु काही अत्यन्त रहस्यमय असे नवे नवे विषय जास्त विस्ताराने समजावेत, विविध क्षेत्रांमधील विविध उदाहरणांच्या माध्यमातून ते विषय अधिकाधिक सुस्पष्टपणे कळत राहावेत, अशी पुष्कळशा भाविकांची इच्छा असते. त्यामुळे आता भाविकांसाठी विविध जीवनावश्यकविषयरूप खास मेजवानी घेऊन हा तन्वास ग्रंथ आला आहे. अनेकानेक महत्त्वपूर्ण सिद्धान्त भाविकांना समजत राहावेत व विविध दृष्टान्तांच्या माध्यमातून त्या सिद्धान्तांचे भाविकांच्या बुद्धीमध्ये स्थिरीकरण व्हावे, हाच तन्वास ग्रंथाच्या अन्तःकरणातील एक पवित्र ध्यास आहे. सगळे भाविक या तन्वास ग्रंथाचे अन्तरंग समजून घेण्याचा प्रयास करतील, असा पूर्ण विश्वास आहे.
[ तन्वास ग्रंथ प्रकाशन तिथी – कार्तिक पौर्णिमा शक १९४४ (दि.७/११/२०२२) ]
शिप्रोत
‘शिप्रोत’ ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत –
पारमार्थिक जीवनात तसेच व्यावहारिक जीवनातही अत्यन्त उपयोगी अशा भरपूर विषयांनी भरलेला ‘शिप्रोत’ ग्रंथ हा भाविकांच्या हातात प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी आला आहे, हा अत्यन्त महन्मंगलयोग आहे.
या ग्रंथात जीवनप्रवासासाठी आवश्यक असलेले अत्यन्त उपयुक्त नियम आहेत, जीवनाचे अस्तित्व योग्यरीतीने टिकवून ठेवण्याच्या बाबी आहेत. या ग्रंथात जीवनाचे मंगलमय पारमार्थिक उत्थान घडविणाऱ्या बाबी आहेत, जीवनातील अत्यावश्यक मांगल्यासाठीचे उपाय आहेत, जीवनाला पवित्र बनविण्याची साधने आहेत.
या शिप्रोत ग्रंथात भाविकांना जीवन सामर्थ्याच्या विविधरूपांचे दर्शन होईल. जीवनातील नाना संकटांवर मात करून पुढे पुढे चालत राहण्याची व इष्ट साध्य प्राप्त करण्यासाठीची प्रेरणा देणारा हा ग्रंथ आहे.
ऋषिमुनी, पुण्यश्लोक राजे इत्यादींपासून सर्वसामान्य माणसांपर्यन्तच्या जीवनातील विशेष घटना भरपूर मोठ्या प्रमाणात या ग्रंथात असल्यामुळे त्या दृष्टान्तरूप घटना जनजीवनामध्ये अत्यन्त चांगले परिवर्तन घडवून आणणाऱ्या आहेत.
या शिप्रोत ग्रंथात परमाब्धि ग्रंथातील काही मुद्यांचे अत्यन्त विस्तृत असे स्पष्टीकरण भाविकांना लाभेल. सर्वजातिधर्मपंथांच्या लोकांना अत्यन्त अत्यन्त आवडेल, असेच या शिप्रोत ग्रंथाचेही स्वरूप आहे.
जीवनरक्षाविषयक मुद्दे, जीवनाची हानी करणाऱ्या अनिष्ट बाबींचा त्याग, जीवनात आवश्यक अशा निश्चयाचे स्वरूप, जीवनाच्या विविध कार्यांमधील सूत्रबद्धता इत्यादी भरपूर विषयांनी तुडूंब भरलेला हा शिप्रोत ग्रंथ आहे.
या ग्रंथामध्ये विविधप्रकारच्या रक्षणप्रक्रिया, शिक्षणप्रक्रिया तसेच इतरही बहुविध प्रक्रियांविषयीचा सुबोध अन्तर्भूत आहे. आपल्या अन्तःकरणातील विविध भावनांपैकी योग्य भावना कोणत्या ते ओळखणे, भावनांचे संतुलन राखणे, योग्य भावनांना अन्तःकरणात विशेषत्वाने स्थापित करणे, योग्य भावनांचा मेळ बसविणे इत्यादी बाबीं विषयी अत्यन्त विस्तृत माहिती भाविकांना या शिप्रोत ग्रंथात वाचायला मिळेल व त्या माहितीचा जीवनात अत्यन्त उपयोग होईल.
जीवनात आवश्यक असलेली मनःशान्ती, साधनेतील उन्नतीसाठी जीवनाचा वापर, हृदयातील ओलावा, बोधप्रकाश इत्यादी अनेकानेक मुद्यांविषयी विस्तृत माहिती या ग्रंथाद्वारे लाभल्याने भाविकांना निश्चितपणे अतीव आनन्द होईल.
आत्मतत्त्व, जगत्, भवरोगचिकित्सा शाळा इत्यादी इतरही भरपूर विषय या शिप्रोत ग्रंथात आहेत. या ग्रंथात विविध धर्मपंथांमधील साधुसंतांच्या संबंधानेही वाचायला मिळेल. इथे फक्त ग्रंथातील काही बाबींचा उल्लेख केला. शिप्रोतमध्ये काय आहे, हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने स्वतः शिप्रोत वाचन करायला पाहिजे. विविध जीवनावश्यक विषयांनी ओतप्रोत भरलेला हा शिप्रोत ग्रंथ प्रत्येकाने वाचावा असाच आहे. शिप्रोत या ग्रंथनामाचा अर्थ काय आहे, अशी जिज्ञासा पुष्कळशा भाविकांमध्ये उत्पन्न होऊ शकेल. ग्रंथ उघडून बघितल्यावर ‘शिप्रोत’ या नामाचे सगळे मंगलमय अर्थ भाविकांना कळून जातील, शिप्रोत वाचनाचा अतीव उत्साहाने शुभारम्भही होऊन जाईल.
[ शिप्रोत ग्रंथ प्रकाशन तिथी – गुरुपौर्णिमा शक १९४६ ( दि.२१/७/२०२४)]
सिध्रेण
“सिध्रेण” या लघुकाय ग्रंथाविषयी ग्रंथकर्ते प.पू.परमात्मराज महाराज यांचे मनोगत –
कोरोना महासंकटाच्या प्रसंगाने जे ५१ लेख लिहिले त्या लेखांचा आध्यात्मिकदृष्ट्या विस्तार करून पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचे ठरविले होते. ते पुस्तक बुधवार दि. २४ जून २०२० ला प्रकाशित होऊन भाविकांच्या हाती आले.
कोरोना महामारीसारख्या अत्यंत भयानक प्रसंगी लोकांमध्ये सावधानता बाळगायला लावणारे विचार आवश्यक असतात. लोकांची मनःस्थिती बिघडणार नाही अशा पद्धतीचे विचार तसेच बिघडलेली मनःस्थिती पुन्हा ताळ्यावर आणणारे विचार लोकांमध्ये पसरणे आवश्यक असते.जनतेमध्ये जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोण टिकून राहणे गरजेचे आहे. या सगळ्या मुद्यांचा विचार करून पुष्कळशे भाविक स्वतःजवळ निश्चितपणे हे पुस्तक ठेवतील, असा पूर्ण विश्वास आहे.
चिकित्सापद्धतीच्या अनुषंगाने या पुस्तकात पक्षपातविरहित वर्णन असल्यामुळे ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमियोपॅथी इत्यादींशी संबंधित डॉक्टरांनाही आवडेल असेच हे पुस्तक आहे. विज्ञानाच्या विविध शाखा तसेच इतरही अनेकानेक विषयांशी संबंधित तज्ज्ञांनाही हे पुस्तक निश्चितपणे आवडेल, असा अतीव विश्वास आहे.
कोणत्याही संकट काळात व इतरही काळामध्ये मानसिक बळ वाढविणारे हे पुस्तक सर्वांनी आपल्या घरी ठेवावे व घरातील सर्वांनी वाचावे.
या पुस्तकात आध्यात्मिक विचारही असल्यामुळे या पुस्तकाकडे श्रद्धावान् लोक ‘एक लघुकाय पवित्र ग्रंथ’म्हणजे छोट्या आकाराचा एक पवित्र ग्रंथ’ – अशा स्वरूपातच बघतील. आकार लहान असो, मोठा असो, त्यासंबंधाने सद्भाविकांमध्ये श्रद्धायुक्त अशी धार्मिक भावना निर्माण होत असते व ती टिकूनही राहत असते.
सर्वांनी सिध्रेणची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत.
हे पुस्तक हातात आल्यावर व याची प्रस्तावना ( भूमिका ) वाचल्यावर भाविकांना सिध्रेण या नांवाचे विविध अर्थ कळून येतील. अतिशय उपयुक्त श्रद्धेच्या अतिशय रमणीय बागेत विहार करू इच्छिणाऱ्या भाविकांना ‘सिध्रेण’या नांवाचे हे सगळे अर्थ आनंद देतील.
कोरोना महासंकटामुळे जनता अत्यंत तणावग्रस्त अवस्था अनुभवली आहे. कुठल्याही कालखण्डात जनतेच्या मनावरील अनावश्यक तणाव दूर करण्यासाठी सिध्रेणमधील विचार निश्चितपणे साहाय्यक होतील.
या पुस्तकात कोरोना संबंधाने जनतेला अतिशय आवश्यक वाटेल एवढी माहिती आहे, याची यथार्थ जाणीव पुस्तक वाचल्यावर सर्वांना होईलच.
पुष्कळदा एकासंकटा पाठोपाठ अनेक संकटे येत असतात. कोरोना संकट इतरही अनेक संकटांना सोबत घेऊन आलेले असल्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या संकटांवर मात करण्याचे मनोधैर्य वाढावे, यासाठी या पुस्तकाचे वाचन अत्यंत उपयुक्त ठरेल. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्राचा प्रस्तावनेमध्ये दिलेला अर्थही जनतेच्या मनाला शांतिदायक, आल्हाददायक वाटेल. तात्पर्य असे की -पुस्तकातील विचार मनाला आनंद देतीलच. परंतु मुखपृष्ठचित्राचा गूढार्थही मनाला आनंददायीच वाटेल.
कोरोना महामारी चे निमित्त साधून अनेकजणांनी अनेकानेक अफवा पसरविल्या. अफवांमुळे जनमनांमध्ये गैरसमज वाढत राहतात. काही जण तर फारच पुढे जाऊन भविष्यातील जगद्विनाशाचे अतिशय भयावह चित्र जनतेला सातत्याने दाखवीत राहतात. परंतु तशा भयावह चित्रांकडे लक्ष न देता जनतेने आपल्या डोक्यात समाधानकारक चित्र उभे केले पाहिजे.कितीही संकटे आली तरी जगाचे शेवटी चांगलेच होईल, अशी भावना ठेवल्यास जीवन जगण्यातील आनंद व समाधान टिकून राहू शकते. या दृष्टिकोणातूनही सिध्रेण हे पुस्तक लाभदायकच ठरणार आहे. नानाप्रकारच्या अफवांपासून जन मनांचे संरक्षण करणारे हे पुस्तक आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर इतरही संबंधित अनेकानेक व्यावहारिक विषयांची माहिती व आध्यात्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण माहितीही या पुस्तकात असल्याने वाचकांचा आनंद बहुगुणित होईल.
(टीप – दि. २४ जून २०२० ला सव्वादहा वाजता सिध्रेण प्रकाशन सोहळा सम्पन्न झाला.)
चेयान
” चेयान” या पुस्तिकेविषयी प. पू. परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत –
विश्वधर्मग्रंथ परमाब्धि ला आत्मसात करण्यासाठी चेयान पुस्तिका आहे.
परमाब्धि ग्रंथाचे महत्व सर्व जातिधर्म संप्रदायांमधील लोकांना कळावे यासाठी चेयान पुस्तिकेत 108 मुद्यांची माला आहे. 108 हा एक अत्यन्त पवित्र अंक आहे. परमाब्धि ग्रंथाचे सर्वजनोपयुक्तत्व समजून घेण्यासाठी चेयान पुस्तिकेतील हे सगळे 108 मुद्दे समजून घेणे विशेष आनन्दवर्धक आहे. सर्वजनकल्याणकारक अशा परमाब्धि ग्रंथाची वैशिष्ट्ये समजण्यासाठी सर्वांनी चेयान या पुस्तिकेचे वाचनसुद्धा करावे.
( प्रकाशन तिथी – मार्गशीर्ष शु. दशमी दि.16-12-2010 )





